मुंबई : IPL 2022 (IPL) मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) दिग्गज दिनेश कार्तिकची (Dinesh kartik) बॅट जोरदार बोलत आहे. त्याला कितीही कमी चेंडू खेळण्याची संधी मिळाली तरी तो आपला प्रभाव सोडत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात त्याने भारतीय संघाचा भाग असावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.
भारताला टी-२० विश्वचषकाच्या संघात कोणत्याही परिस्थितीत दिनेश कार्तिकचा समावेश करावाच लागेल, असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने म्हटले आहे. दिनेश कार्तिकने या आयपीएल मोसमात आरसीबीसाठी जबरदस्त फिनिशरची भूमिका बजावली आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला आहे.
त्याने आतापर्यंत 12 सामन्यांत 200 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने आणि 68.50 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 12 डावांमध्ये तो 8 वेळा नाबाद राहिला आहे.
दिनेश कार्तिकला विश्वचषक संघात संधी मिळायला हवी : मायकेल वॉन
रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धही त्याने चांगली खेळी केली. कार्तिकने केवळ 8 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकार मारून नाबाद 30 धावा केल्या. यामुळेच मायकेल वॉनला दिनेश कार्तिकने भारताच्याटी-20 विश्वचषक संघाचा भाग असावा असे वाटते.
एका वृत्तवाहिनीवरील संभाषणादरम्यान, तो म्हणाला, “भारताला दिनेश कार्तिकचा टी-20 विश्वचषकाच्या संघात समावेश करावा लागेल. भारतीय संघात 6 ते 8 क्रमांकाचे स्थान अस्थिर आहे. हार्दिक पांड्या संघात नक्कीच आहे पण त्याला सतत दुखापत होत आहे. संघाकडे उत्कृष्ट फिनिशर नाही. कार्तिक ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता तो कॉमेंट्री बॉक्समध्ये नसून भारतीय जर्सीमध्ये मैदानावर असावा.”