नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालाही आगामी हंगामासाठी कायम ठेवण्यात आले आहे. जडेजा संघात कायम राहिल्याने अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले कारण गेल्या हंगामात जे घडले त्यानंतर रवींद्र जडेजा संघातून बाहेर पडणार याची शक्यता वर्तवली जात होती.

चेन्नई आणि जडेजा यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या अनेक अफवा मीडियामध्ये पसरल्या होत्या. या अफवांना उधाण आले जेव्हा जड्डूने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फ्रेंचायझीशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या. मात्र, आता या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला असून आता चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला पुढील हंगामासाठी कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. काही वेळाने रवींद्र जडेजाने सर्व काही ठीक असल्याचे संकेत दिले.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने इंस्टाग्रामवर रवींद्र जडेजाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यावर जडेजाने मी येत आहे, अशी कमेंट केली आहे.

रवींद्र जडेजाला गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी फारच खराब झाली. सलग अनेक सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर जडेजाला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी एमएस धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले.

त्याचवेळी जडेजाही काही सामन्यांतून बाहेर होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर पडला होता. जडेजा आणि CSK यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्याही वेळोवेळी येत होत्या. मात्र, आता तो पुन्हा एकदा संघाचा भाग असणार आहे.