नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेनंतर भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 सामने खेळायचे आहेत. या मालिकेद्वारे भारतीय संघ व्यवस्थापनाला त्यांची बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी आहे.
त्यामुळेच आयर्लंड दौऱ्यावर अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी आयपीएल 2022 मध्ये चांगली फलंदाजी केली होती. मात्र, असे अनेक खेळाडू होते ज्यांना संधी मिळाली नाही.
अशातच राहुल तेवतिया याने दुर्लक्ष होत असल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. या दौऱ्यासाठी पृथ्वी शॉचीही निवड झालेली नाही. शॉने आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली फलंदाजी केली तसेच त्याने मुंबईचा कर्णधार असताना, रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अर्धशतके झळकावली.
पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष केल्याने, त्याचे दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी त्याला एक सल्ला दिला आहे. शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जाऊन धावा केल्या पाहिजेत आणि त्याच्या मूलभूत खेळावर काम करत राहिले पाहिजे, असे कैफने म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना कैफ म्हणाला, “पृथ्वी शॉ खूप तरुण आहे. सध्या भारतीय संघात अनेक सलामीवीर आहेत. शुभमन गिल मयंक अग्रवाल, केएल राहुल, रोहित शर्मा. होय, स्पर्धा आहे. पण शॉच्या जागी मी असतो तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलो असतो. तो रणजी ट्रॉफी फायनल खेळणाऱ्या मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे.”
चांगल्या खेळाडूंमुळे शॉला संधी मिळत नाही : कैफ
पृथ्वी शॉ अखेरचा टीम इंडियाकडून जुलै 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला. कैफ पुढे म्हणाला, “त्याने मागे जावे, धावा केल्या पाहिजेत. त्याला परत यायला अजून बराच वेळ आहे. मी त्याच्यासोबत काम केले आहे. त्याच्याकडे कौशल्याबरोबरच ‘एक्स फॅक्टर’ आहे. जेव्हा त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळेल. तो जोरदार पुनरागमन करेल. पण मी म्हटल्याप्रमाणे भारताकडे सध्या खूप चांगले खेळाडू आहेत. त्यामुळेच त्याला आगामी मालिकेत संधी मिळत नाही.
सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे युवा खेळाडूंनी सजलेल्या १७ सदस्यीय संघाची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या या संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात 26 आणि 28 जून रोजी दोन टी-20 सामने होणार आहेत.