इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 30 व्या सामन्यात सोमवारी युझवेंद्र चहल झळकला. राजस्थान रॉयल्सच्या या फिरकीपटूने शानदार गोलंदाजी करत कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. चहलच्या या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने केकेआरचा ७ धावांनी पराभव केला.

चहलने डावाच्या १७व्या षटकात श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना लागोपाठ चेंडूत बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. आयपीएलच्या इतिहासातील ही २१वी हॅट्ट्रिक ठरली. पॅट कमिन्सची विकेट घेत चहलने हॅट्ट्रिक पूर्ण केली. चहल हॅट्रिकपूर्ण करताच उपस्थित प्रेक्षकांमध्ये चांगलाच जल्लोष पाहायला मिळाला तसेच चाहलने देखील अनोख्या पद्दतीने सेलिब्रेशन केले. आनंदाने धावत आलेल्या चहलने त्याची एक जुनी मेम पुन्हा रिक्रिएट केले.

2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान चहल जसा सीमारेषेजवळ जमिनीवर झोपला होता. चहलची स्टाईल लोकांना आवडली होती, त्यानंतर बरेच दिवस या पोजची सोशल मीडियावर मीम्स बनवले गेले. KKR विरुद्धचा सामना संपल्यानंतर चहलने पुन्हा तो क्षण रिक्रिएट केला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 5 विकेट गमावत 217 धावा केल्या. जोस बटलरने 61 चेंडूंत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 103 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय संजू सॅमसनने 38 आणि शिमरॉन हेटमायरने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेनने सर्वाधिक दोन खेळाडूंना बाद केले.

प्रत्युत्तरात केकेआरचा संघ 19.4 षटकांत 210 धावांत गारद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने 85 आणि अॅरॉन फिंचने 58 धावांचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने 40 धावांत 5 बळी घेतले. त्याचवेळी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ओबेद मॅकॉयने दोन खेळाडूंना बाद केले.

Leave a comment

Your email address will not be published.