नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ‘कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत.

तर सकाळी 11 वा. ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादीबाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनाद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.