नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न केल्यामुळे हार्दिकवर टीका झाली होती. यावर हार्दिकने पत्रकार परिषदेत उत्तर दिले होते. त्यावर आता आर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनला वाटते की हार्दिकमध्ये धोनीप्रमाणे विचार करण्याची क्षमता आहे.

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघात नेतृत्व बदल झाले. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत ​​हार्दिक पांड्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधारपद देण्यात आले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाने न्यूझीलंडमध्ये 1-0 ने मालिका जिंकली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता.

संजू सॅमसनला तिसऱ्या टी-20 सामन्यातही स्थान मिळाले नाही, तेव्हा क्रिकेट चाहत्यांनी हार्दिकवर टीका करण्यास सुरुवात केली. यावर हार्दिकने उत्तर दिले की, “त्याला माहित आहे की हे वैयक्तिक नाही. ते स्थितीशी संबंधित आहे. बाहेरून कोण काय म्हणतंय याने आम्हाला काही फरक पडत नाही. ही माझी टीम आहे. प्रशिक्षक आणि मला जे योग्य वाटेल ते निर्णय घेतले जातील. अजून बराच वेळ असून सर्वांना संधी दिली जाईल. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हाला दीर्घ संधी मिळेल. कर्णधार या नात्याने मला खेळाडूंना जेवढे स्वातंत्र्य देता येईन तेवढे स्वातंत्र्य देईन.”

यावरच आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला, “मला माहित नाही की त्याला थला धोनीच्या स्टाईलमध्ये म्हणायचे आहे की नाही, कारण आपल्या सर्वांना माहित आहे की हार्दिक थला धोनीच्या खूप जवळ आहे. सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असलेला एक अवघड प्रश्न त्याने सुंदरपणे हाताळला. त्यामुळेच हार्दिकचे अभिनंदन.”