नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK)या संघांमधील होणार सामना नेहमीच चर्चेत असतो. तसेच या सामन्याचे जगभरात चाहते आहेत, जे या दोन्ही देशांमधील सामन्याची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. पण दोन्ही देशांमधील तणावामुळे हे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.

गेल्या वेळी विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे, यावेळी होणाऱ्या सामन्याबाबत काहीही बोलण्यास हरभजन सिंगने नकार दिला आहे.

याबाबत बोलताना भज्जी म्हणाला, “यावर्षी आमच्यासमोर आणखी एक विश्वचषक असणार आहे, मी त्याबद्दल कोणतेही विधान करणार नाही किंवा तो कोण जिंकेल हे सांगणार नाही (भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्यात). कारण, मागच्या वेळी जेव्हा मी त्याबद्दल बोललो तेव्हा गोष्टी बिघडल्यासारखे दिसत होत्या.

गेल्या वेळी टी-20 विश्वचषकापूर्वी हरभजन सिंग म्हणाला होता की, “पाकिस्तान संघाने भारताला वॉकओव्हर द्यावा कारण त्यांच्याकडे जिंकण्याची कोणतीही शक्यता नाही.” पुढे हरभजन म्हणाला, “मी शोएब अख्तरला सांगितले होते की तुमच्या संघाला आमच्याविरुद्ध खेळवण्यात काही अर्थ नाही, तुम्ही आम्हाला वॉकओव्हर द्या. तुम्ही आमच्याविरुद्ध खेळाल आणि आम्ही तुम्हाला पुन्हा हरवू, मग तुमची निराशा होईल, त्यामुळे खेळण्यात काही अर्थ नाही.”

पण हरभजनने केलेले विधान पूर्णपणे चुकीचे ठरले, पाकिस्तानच्या संघाने आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताविरुद्धचा पहिला विजय तर मिळवलाच, शिवाय विक्रमी 10 गडी राखून विजय नोंदवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या सुरुवातीच्या विकेट्स घेत मोठा धक्का दिला. विराट कोहलीच्या 57 आणि ऋषभ पंतच्या 39 धावांमुळे भारताने 8 बाद 151 धावा केल्या, जे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 13 चेंडू शिल्लक असताना एकही विकेट न गमावता पूर्ण केले.