नवी दिल्ली : भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर सर्वत्र प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना पदावरून हटवण्याची मागणी झाली. यावरच आता माजी गोलंदाज हरभजन सिंगने आपले मत मांडले आहे.

हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार आशिष नेहरासारखा कोणीतरी भारताच्या टी-20 कोचिंग सिस्टमचा भाग असावा कारण त्याला सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडपेक्षा खेळाचे सर्वात लहान आंतरराष्ट्रीय स्वरूप चांगले समजते.

हरभजनने पीटीआय दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, ‘टी-20 फॉरमॅटमध्ये तुमच्याकडे आशिष नेहरासारखा कोणीतरी असायला हवा, ज्याने नुकताच खेळाला अलविदा केला आहे. त्याला हे स्वरूप अधिक चांगले समजते. मी राहुलसोबत बराच काळ खेळलो आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे. मी त्याच्या खेळाच्या आकलनावर शंका घेत नाही पण हे स्वरूप थोडे वेगळे आणि अवघड आहे.

हरभजन सिंग म्हणाला, ‘ज्याने अलीकडे हा खेळ खेळला आहे तो टी-20 मध्ये कोचिंगच्या पदासाठी चांगला आहे. तुम्ही राहुलला टी-20 मधून काढून टाका असे मी म्हणत नाही. आशिष आणि राहुल दोघेही 2024 विश्वचषकासाठी संघ तयार करण्यासाठी एकत्र काम करू शकतात. हरभजन अबू धाबी टी-10 लीगमधील दिल्ली बुल्स संघाचा भाग आहे.

इंग्लंडच्या T20 विश्वचषकाच्या विजयामुळे वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक आणि खेळाडू निवडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तो म्हणाला, “अशा व्यवस्थेमुळे राहुलला विश्रांती घेणे सोपे जाईल आणि त्याच्या अनुपस्थितीत नेहरा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारू शकेल.”