मुंबई, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून निधी मिळण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावर श्री.सावे यांनी तत्काळ निर्णय घेत घरकुल योजनेसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागाला दिले.

यावेळी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे यांनी बल्लारपूर मतदारसंघातील सर्व तालुक्यांत यशवंतराव मुक्त वसाहत योजनेतून घरांसाठी नवीन प्रस्तावानुसार तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागाला दिल्या. आता बल्लारपूर मतदारसंघातील भटक्या विमुक्त जनजातींच्या कुटुंबांना घरांसाठी तातडीने निधी उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत निधी दिलेल्या घरांची कामे सुरू झाल्यापासून 120 दिवसात घरे बांधून पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे बल्लारपूरमधील चारही तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील घरकूल हव्या असलेल्या लाभार्थींना लाभ होणार आहे.राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.