चंद्रपूर,दि.२३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यांना ३०० कोटी रुपये मिळाले असून या क्षेत्रातील ९० टक्के गावे नळजोडणीद्वारे जोडली गेली आहेत. या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत शंकरपूर येथे चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यातील ३०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, अधीक्षक अभियंता प्रशांत बुरडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ओमराज हेडाऊ, कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशन अभियानामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग आहे. ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या अभियानांतर्गत ३२ हजार गावांचे डिपीआर तयार करण्याचे कार्य केले. पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सर्वात मोठे काम या क्षेत्रात झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नळ योजनेतून ४० लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होत होता, आता ५५ लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होणार आहे. विज बिलाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना सोलर प्रणालीवर कार्यान्वित करण्यात आल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून घरपोच पिण्याचे पाणी मिळत असल्याने महिलांचा त्रास कमी झाला असून पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. जलजीवन मिशन योजनेतंर्गत या क्षेत्रात चांगले काम करा, निकृष्ठ कामे केल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आमदार श्री. भांगडीया म्हणाले की, केंद्र सरकार जल जीवन मिशन देशात राबवित आहे. देशात व राज्यभरात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. हर घर नल से जल या योजनेच्या माध्यमातून महिलांचा त्रास कमी होणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुमारे ३००  कोटी रु. निधी या क्षेत्रासाठी मिळवून दिला आहे. जलजीवन मिशन अतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा सर्वप्रथम व सर्वाधिक लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला मिळाला आहे. तत्पुर्वी, मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पार पडले.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी प्रास्ताविक केले.

किशोर गलांडे यांनी सूत्रसंचालन केले तर राजू देवतळे यांनी आभार मानले.