धुळे दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनामार्फत धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजनांची यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालक सचिव श्री. रस्तोगी यांनी शासनाच्या विविध योजनांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले, उप वनसंरक्षक कृष्णा भवर, अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त नितीन कापडनीस, धुळे पाटबंधारे प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता सु. स. खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालक सचिव श्री. रस्तोगी म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनपाने वृक्षसंवर्धनाचे काम करावे. प्लास्टिक बंदीनंतर त्याला पर्याय म्हणून कापडी पिशवीचा वापर वाढावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ वेळेत मिळेल याबाबत नियोजन करावे. रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते, वीज, पाणी याच्या उपलब्धतेची काळजी घ्यावी. ई-पीक पाहणीबाबत ऑनलाईन माहिती भरण्याचे काम वेळेत पूर्ण करावे. महसूल विभागाच्या ई-फेरफार नोंदणीची माहिती वेळेत नोंदविण्याच्या सूचना यावेळी दिल्या. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात विविध योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना अनुदान वाटपाची माहिती दिली.

बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी जिल्हा वार्षिक योजना, आमदार, खासदार निधी व डोंगरी विकास निधीची, महानगरपालिकेचे  अतिरिक्त आयुक्त नितीन कापडनीस यांनी शहरातील कामांची, उपजिल्हाधिकारी  गोंविद दाणेज यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी जलजीवन मिशन, पेयजल योजना, हर घर नल  योजना, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. मालपुरे यांनी कृषी विभागाच्या योजनांची, अधिक्षक अभियंता विवेक नवले यांनी धुळे जिल्ह्यातील रस्त्यांबाबत तर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी महसूल विभागाच्या विविध कामांबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.