मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पठाण’ या चित्रपटानंतर शाहरुख खानच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख खान काम करणार आहे.

शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाची घोषणा केली आहे. किंग खानने राजकुमार हिराणीचे सांताक्लॉज असे वर्णन केले आहे. चित्रपटाच्या घोषणेचा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. ज्यामध्ये शाहरुख राजकुमार हिरानी यांना चित्रपटात कामासाठी विचारताना दिसला होता. त्यानंतर जेव्हा दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली तेव्हा चित्रपटाचे शीर्षक ऐकून शाहरुख खान गोंधळला.

‘डंकी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर राजकुमार हिरानी म्हणाले, “शाहरुख खान माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच माझ्या इच्छांच्या यादीत आहे आणि मी यापूर्वी अनेकदा एकत्र काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, शेवटी डंकी आमची भागीदारी तयार करेल. ऊर्जा, करिष्मा, विनोद आणि त्याने चित्रपटात आणलेले आकर्षण अतुलनीय आहे आणि ती जादू मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”

तसेच, राजकुमार हिरानीसोबत काम करण्याविषयी शाहरुख खान म्हणाला, “राज कुमार हिरानी हे या पिढीतील उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत, आम्ही नेहमीच एकत्र काम करण्याबद्दल बोललो आणि मला खूप आनंद होत आहे की आम्ही ‘डंकी’सोबत असे करत आहोत. राजूसाठी मी गाढव, माकड… काहीही होऊ शकतो.”

दरम्यान, ‘डंकी’ हा चित्रपट जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स संयुक्तपणे सादर करणार आहेत. तसेच, राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.