नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतीनंतर मैदानात उतरला आहे. दुलीप करंडक स्पर्धेत उत्तर पूर्व विभागाविरुद्ध पश्चिम विभागाचा कर्णधार म्हणून आलेल्या या दिग्गज खेळाडूने दमदार खेळी केली. त्याने शानदार फलंदाजी करताना द्विशतक झळकावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 2 बाद 590 धावांची मोठी मजल मारली होती. यशस्वी जैस्वालनेही द्विशतक झळकावले.

भारताच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रहाणेने दमदार पुनरागमन केले आहे. दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाचे कर्णधारपद भूषवताना त्याने फलंदाजी करताना अप्रतिम खेळी केली. सामन्याच्या पहिल्या दिवशी नॉर्थ ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी आणि पृथ्वी शॉ यांनी संघाला पहिल्या दिवशी बिनबाद 116 धावांपर्यंत मजल मारून दिली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी 113 धावांवर बाद झाला तर यशस्वीने 228 धावा केल्या.

रहाणेचे धमाकेदार पुनरागमन

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रहाणेने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी केली. त्याने प्रथम यशस्वीसोबत ३३३ धावांची भागीदारी केली. त्याने 135 चेंडूंचा सामना करून आपले शतक पूर्ण केले. हा डाव पुढे नेत परतीच्या पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहाणे 264 चेंडूत 207 धावांवर खेळत होता. त्याने आपल्या खेळीत 18 चौकार आणि 6 षटकार मारले.