मुंबई : IPL 2022 मध्ये दिनेश कार्तिकने दबावाखाली जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत 204.55 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 90 धावा केल्या आहेत आणि तो अद्याप स्पर्धेत आउट झालेला नाही. आरसीबीचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक वयाच्या ३६ व्या वर्षीही आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने व्यक्त केला आहे.
आकाश चोप्राने दिनेश कार्तिकच्या अलीकडच्या फॉर्मबद्दल आशा व्यक्त केली आहे की तो अजूनही टीम इंडियात पुनरागमन करू शकेल. याविषयी बोलताना तो म्हणाला, “तो खरोखर चांगले काम करत आहे आणि वय हा फक्त एक आकडा आहे. मग तुम्ही कशाला काळजी कराल? कोणी चांगले खेळत असेल तर वयाने फरक कसा पडतो? एक मोठी गोष्ट म्हणजे तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, त्याच क्रमांकावर टीम इंडियाची गरज आहे. पण त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत हेही पाहावे लागेल. दीपक हुडा हा देखील स्पर्धक आहे, कारण तो थोडा ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. पण जर तो असाच खेळत राहिला तर तुम्ही त्याचा विचार करू शकता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 44 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि संघाच्या संस्मरणीय विजयात योगदान दिले. दिनेश कार्तिकने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. त्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. जरी त्याने समालोचक म्हणून खूप काम केले आहे.