नवी दिल्ली : टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहलीने चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत अखेर 71वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहे. विराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावून ही मोठी कामगिरी केली आहे.

कोहलीचे 71 आंतरराष्ट्रीय शतक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर आता ७१ शतके आहेत आणि या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. रिकी पाँटिंगनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ शतके झळकावली आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

  1. सचिन तेंडुलकर – 100 शतके

२. विराट कोहली – 71 शतके / रिकी पाँटिंग – 71 शतके

गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात विराट कोहलीने सलामीला 61 चेंडूत 122 धावा केल्या. यादरम्यान विराट कोहलीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चकवा देत 12 चौकार आणि 6 षटकार खेचले. विराट कोहलीचे हे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील हे त्याचे 71 वे शतक आहे.

विराट कोहलीने आणखी एक विक्रम केला

यासोबतच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 3500 धावाही पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा रोहित शर्मानंतर जगातील दुसरा खेळाडू आहे. विराट कोहलीच्या आता T20 मध्ये 104 सामन्यांच्या 96 डावात 3584 धावा झाल्या आहेत. त्याची सरासरी 51.94 आहे, विराटचे T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32 अर्धशतक आणि 1 शतक आहे.