मुंबई, दि. 15:- पावसाळी अधिवेशनातील विनियोजन विधेयकांच्या कार्यवाहीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयकावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. अश्विनी जोशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संजय खंदारे आदींसह उच्च व तंत्र शिक्षण, गृह, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्यटन विभागाने शास्त्रशुद्ध पद्धतीने गड-किल्ल्यांचे संवर्धन होईल यासाठी व्यवस्थापनासंदर्भात आराखडा तयार करून, मंजूरी मिळतील त्याप्रमाणे ती कामे पूर्ण करावीत. वैद्यकीय शिक्षण विभागाने सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तातडीने सुरू करावे. तसेच अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्थानिक स्तरावरील समस्या सोडवून पुढील कार्यवाही करावी. वैद्यकीय महविद्यालयासाठी स्टाफ नेमण्यासाठी पदभरतीस मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार  पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाने मेडिकल इंडस्ट्रियल पार्क संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री यांनी आश्वासित केलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजी राजे शौर्य पुरस्काराचे निकष ठरविणारी समिती तात्काळ गठित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सहकार विभागाने जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणे, मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात वास्तूविशारद नेमून पुढील कार्यवाही करावी. याचबरोबर कृषी, गृह, सहकार व पणन, उच्च शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागासही प्रलंबित व सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिल्या.