महाअपडेट टीम, 29 जानेवारी 2022 : महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केट, मॉल मध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिल्याने आता किराणा दुकानतही वाईन मिळताना दिसून येणार आहे.
परंतु यावर विरोधकांनी दोन दिवसांपासून जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकारने महाराष्ट्राचं ‘मद्यराष्ट्र’ केलं असल्याची जहरी टीका सरकारवर केल्याने आता यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दारू आणि वाईन मधला फरकच सांगितला. ते म्हणाले की, किराणा स्टोअर्स सुपर मार्केटमॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी वाईन विक्रीसाठी किराणा स्टोअर किंवा सुपर मार्केटचा आकार हा एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असण्याची अट आहे.
विरोधकांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, वाईन आणि दारू यात फरक आहे. द्राक्ष आणि काजू या फळांतून वाईन तयार केली जाते. अनेक फळातून वाईन तयार केली जाते. वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे.
बाहेरच्या राज्यात किंवा परदेशात त्याची निर्यात केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाईनच पितात. पण काहींनी मद्यराष्ट्र म्हटलं आहे. मध्यप्रदेशात तर घरपोच वाईन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षाची मागणी आहे.
वाईन विकण्यासाठी काही नियम अटी घालून परवानगी दिली आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची नियमावली तयार होणार आहे. परंतु काही लोक व्हिडिओ काढून सरकारविरोधी प्रचार करत आहेत. जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.