नागपूर, दि. 26 : “संसदीय लोकशाहीमध्ये सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे सदस्य सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. हे संसदीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे”, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आमदार रोहित पवार यांनी ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’  या विषयावर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, “समाजकारण व राजकारणात युवकांना संधी ही अचानक येऊ शकते. या संधीमध्ये युवकांनी जबाबदारीने व योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. संसदीय अभ्यासवर्गात मलाही आज  अचानक संधी मिळाली. तुम्हालाही राज्यातील निवडक विद्यार्थ्यांमधून संसदीय अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या सभागृहात बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य ती सामाजिक भूमिका घेणे, ही तुमची जबाबदारी आहे. आपण चांगले नागरिक होणे महत्त्वाचे आहे. मतदान प्रक्रियेत लोकशाहीसाठी सर्वांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे”.

“सभागृहामध्ये सत्तारुढ व विरोधी सदस्य हे आपआपल्या परीने जनसामान्यांचे प्रश्न मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्याच्या मुद्यांवरुन काही वेळेस सत्तारुढ व विरोधी पक्षांत मतभेद निर्माण होतात. अशा वेळी दोन्ही पक्षांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने सहकार्य व सामंजस्याची भूमिका घेणे महत्त्वाचे असते. राज्याच्या विधिमंडळाने यापूर्वी सत्तारुढ व विरोधी पक्षांच्या सहमतीने व सहकार्याने अनेक महत्त्वाचे कायदे केलेले आहेत. ते पुढे देशपातळीवरही घेण्यात आलेले आहेत. संसदीय लोकशाहीसाठी  सत्तारुढ व विरोधी पक्षांत संतुलन असणे आवश्यक आहे. सत्तारुढ पक्षाने राज्याच्या हिताच्या दृष्टीने विरोधी पक्षाच्या सूचनांचा व मुद्यांचा आदर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनीही जनहिताच्या निर्णयांना सहकार्य करणे आवश्यक आहे. यातूनच संसदीय लोकशाही सक्षम होण्यास मदत होणार आहे”  असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री. पवार यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. पवार यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.चिन्मयी तळेकर यांनी आभार व्यक्त केले.