मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर किरन पोलार्ड (Kiran polard)आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विंडीजचा कर्णधार राहिला आहे. नुकतीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

मुंबईसाठी इंडियन प्रीमियर लीग 2022 चा हंगाम काही चांगला राहिला नाही. या मोसमात पोलार्ड मुंबईच्या सर्वात अयशस्वी फलंदाजांपैकी एक ठरला. तो बॉल आणि बॅट दोन्हीत संघर्ष करताना दिसला. पण आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ सामना जिंकू शकतो. यामागे एक खास कारण आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये या कॅरेबियन खेळाडूचा प्रवास चांगला नव्हता. पोलार्डने आयपीएल 2022 मध्ये 11 सामने खेळले आहेत ज्यात त्याला केवळ 144 धावा करता आल्या. चालू मोसमात त्याला एकही अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 25 धावा होती. त्याच्या अपयशाचा परिणाम मुंबई इंडियन्सवरही झाला.

यामुळेच रोहित शर्माची टीम आयपीएल 2022 मधून प्रथम बाहेर पडली आहे. पण आजचा 12 मे हा दिवस पोलार्ड आणि मुंबईसाठी खास आहे. खरे तर पोलार्डच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमध्ये एकही सामना गमावलेला नाही.

किरन पोलार्ड 2010 मध्ये मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित होता. तेव्हापासून तो या संघाचा एक भाग आहे. पोलार्ड मुंबईत सामील झाल्यानंतर, संघाने 12 मे रोजी आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये रोहितच्या संघाला विजयाची नोंद करण्यात यश आले. अशा प्रकारे, पोलार्ड आणि मुंबई इंडियन्ससाठी १२ मे हा लकी दिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा सामना खेळणार आहे.

12 मे 2019 हा दिवस मुंबई इंडियन्स आणि किरन पोलार्डसाठी खूप खास आहे. पोलार्डच्या वाढदिवसादिवशी मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक विजेतेपदाच्या सामन्यात मुंबईने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अंतिम सामन्यात लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला बाद करत मुंबईला विजय मिळवून दिला.

Leave a comment

Your email address will not be published.