मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर जवळपास तासभर चौकशी करण्यात आली. ही बातमी समोर आल्यापासून अभिनेत्याचे चाहते चिंतेत आहेत. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अखेर, कस्टम विभागाने अभिनेत्याला अशी वागणूक का दिली? अभिनेत्याने असे काय केले असा प्रश्न पडला? या प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखात देणार आहोत. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण…

शाहरुख खान शुक्रवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी UAE मधून मुंबईला परतत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये आयोजित शारजा बुक फेअर कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अभिनेता त्याच्या खाजगी चार्टर विमानाने मुंबईला पोहोचला. सकाळी 12.30 च्या सुमारास विमानतळाच्या T3 टर्मिनलवर तपासणी केली असता, अभिनेत्याच्या सामानात सुमारे 18 लाख रुपयांची महागडी घड्याळे सापडली. कस्टम विभागाने या घड्याळांची चौकशी केली असता, ही घड्याळे भारतात आणण्यासाठी अभिनेत्याने कोणतेही कस्टम ड्युटी भरली नसल्याचे आढळून आले.

यानंतर शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण टीमला विमानतळावर थांबवण्यात आले. कस्टम अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली आणि सुमारे एक तासानंतर त्याला आणि त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी यांना सोडून देण्यात आले. मात्र, कस्टम विभागाने अभिनेत्याचा अंगरक्षक रवी आणि अन्य काही सदस्यांना पुढील प्रक्रियेसाठी विमानतळावर ताब्यात घेतले. घड्याळांची किंमत निश्चित केल्यानंतर, शाहरुखचा अंगरक्षक रवीने अभिनेत्याच्या क्रेडिट कार्डद्वारे 6.83 लाख रुपये कस्टम ड्युटी भरली, त्यानंतर त्याच्या संपूर्ण टीमला जाण्याची परवानगी देण्यात आली.