प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहने अलीकडेच शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ या टॉक शोला हजेरी लावली. यादरम्यान त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक पैलूंचा खुलासा केला आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
बादशाहने यावेळी लॉकडाऊननंतर शो करणे त्याच्यासाठी किती कठीण झाले होते हे सांगतले आहे. वजनामुळे त्याला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला होता.
शोमध्ये शिल्पा शेट्टीने बादशाहला वजन कमी करण्याचे कारण विचारले असता, तो म्हणाला, “माझ्याकडे वजन कमी करण्याची अनेक कारणे होती. लॉकडाऊन दरम्यान आम्ही कोणताही शो केला नाही आणि नंतर अचानक सर्व काही उघडे झाले. त्यानंतर मी जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा मला समजले की मला थकवा तसेच श्वास घेण्यास त्रास होत आहे.
15 मिनिटांत मला दम लागायचा. माझ्या कामासाठी, मला 120 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ स्टेजवर घालवला लागतो. अशावेळी माझ्यात तेवढा स्टॅमिना नव्हता की थांबू शकेल. एक कलाकार म्हणून मला स्टेजवर सक्रीय राहावे लागते, हे वजन कमी करण्यामागचे मुख्य कारण आहे.
बादशाह पुढे म्हणाला, “मला स्लीप एपनियाचा त्रास होत होता. कालांतराने त्याचे प्रमाण वाढते आणि हा एक धोकादायक आजार आहे. ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगू इच्छितो की मला घोरण्याची मोठी समस्या होती. मात्र, आता आपल्याला हा त्रास नसून तो पूर्णपणे बरा झाल्याचे बादशाहने स्पष्ट केले आहे.