शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याचे वृत्त आहे. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्या खुब्याला मार लागला आहे.

भिडे यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

अपघाताची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

संभाजी भिडे गुरुजी हे सायकलवरून प्रवास करतात. नेहमी प्रमाणे ते सायंकाळच्या सुमारास शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले होते.

दरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपण चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. ही घटना आसपासच्या लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ धाव घेत संभाजी भिडे गुरुजी यांना सावरले.

मात्र, या अपघातामध्ये त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अनेक धारकऱ्यांना गणपती मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी केली होती. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संभाजी भिडे यांनी कालच एक वक्तव्य केलं होतं. व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते. या भूतबाधेवर, विषबाधेवर उपाय आहे.

पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मिरजमध्ये शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते.

ते म्हणाले की, म्लेंच बाधा, आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तिनही बाधांवर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची उपासना आपण केली पाहिजे.

म्लेंच बाधा म्हणजे पाकिस्तान, बांग्लादेशच्या मुस्लिम समाजाच्या विचारांची बाधा, आंग्ल बाधा म्हणजे इंग्रज आपल्यावर स्वार झाले आणि त्यामुळे झालेली इंग्रजी विचारांची बाधा, तर शस्त्राविना स्वातंत्र्य मिळते हा विचार म्हणे गांधी विचारांची बाधा. अशा तीन बाधा हिंदुस्थानला झाल्याचं संभाजी भिडे म्हणाले.

Leave a comment

Your email address will not be published.