नवी दिल्ली : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात खेळणार नाही. वैद्यकीय कारणामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत टीम साऊदी संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनलचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने किवी संघाचा वाईट पद्धतीने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 191 धावा केल्या, प्रत्युत्तरात किवी संघ सात चेंडू शिल्लक असताना 126 धावाच करू शकला.

सूर्यकुमार यादवने जबरदस्त शतक झळकावत टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. आता दोन्ही संघांमध्ये एक टी-20 सामना बाकी आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास मालिका त्यांच्या नावावर होईल. त्याचबरोबर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

केन विल्यमसन न खेळल्याने किवी संघाला मोठा झटका बसला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. मात्र, त्याच्या जागी आलेल्या मार्क चॅपमनकडून संघाला मोठ्या आशा आहेत. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, “मार्क चॅपमन हा जबरदस्त दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्या येण्याने संघात विविधता येईल.”

कर्णधार केन विल्यमसन आता थेट वनडे मालिकेत परतणार आहे. टी-20 नंतर दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाकडे पाहता आता प्रत्येक एकदिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.