नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघ आणि आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा शनिवारी रात्री मेलबर्नमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या अपघातात त्याचा पाय मोडला आहे. पायाच्या दुखापतीमुळे आरसीबीचे प्रमुख खेळाडू तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहेत. ही बातमी आयपीएल 2023 च्या चार महिन्यांपूर्वी आली आहे.

मॅक्सवेल त्याच्याच शहरात मित्राच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. ऑस्ट्रेलियन मीडियाने वृत्त दिले की तो मित्राच्या घरी टेनिस कोर्टवर धावत होता तेव्हा दोघेही पाय घसरून पडले, त्यांनंतर त्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे.

या विचित्र अपघातामुळे स्फोटक अष्टपैलू खेळाडूचा डाव पाय फ्रॅक्चर झाला आहे. रविवारी दुपारी मॅक्सवेलच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तो आता लवकरच बरा होईल अशी अशा आहे, मात्र त्याला दोन ते तीन महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. हा अपघात पार्टीच्या सुरुवातीलाच झाला असल्याचे समोर आले आहे.