नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यापूर्वी (IND vs SA) आज दोन्ही संघ कटक येथील बाराबती स्टेडियमवर पोहोचले आहेत. पहिला सामना गमावल्यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाच्या नजरा दुसऱ्या टी-20 सामन्यावर असतील.

मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत भुवनेश्वर कुमारनेही पराभवाचे कारण सांगितले आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भुवनेश्वर कुमार म्हणाला की, “खराब गोलंदाजीमुळे आम्ही पहिला सामना गमावला आहे. गोलंदाजांनी कामगिरी केली नाही तर कर्णधार फार काही करू शकत नाही. संघात सीनियर गोलंदाज नाहीत, ज्युनियर्स गोलंदाजांना कामगिरी सुधारण्याची गरज आहे. मला आशा आहे की चांगल्या गोलंदाजीने पुनरागमन होईल.”

प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गडी गमावून 211 धावा केल्या होत्या, ऋतुराज गायकवाड (23), श्रेयस अय्यर (36) आणि इशान किशन (76) यांच्यासह ऋषभ पंत (29) आणि हार्दिक पंड्या (31*) यांनी महत्त्वाची खेळी केली आहे.

सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या 3 विकेट्स घेतल्यानंतर टीम इंडिया विजयाच्या वाटेवर असल्याचे दिसत होते, पण मिलर आणि डुसेन यांनी मिळून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या.

आता कटकमध्ये भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे, विशेषत: गोलंदाजीत, कारण भारतीय गोलंदाजांनी पहिल्या टी-20मध्ये बर्‍याच धावा दिल्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सोपे झाले.