मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा भारती आणि हर्ष यांच्यावर मुसक्या आवळल्या आहेत. एनसीबीने या दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

भारती-हर्षच्या अडचणी वाढल्या

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरोधात कोर्टात 200 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ड्रग्ज प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या जोडप्याला 2020 मध्ये ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र आता पुन्हा एकदा भारती आणि हर्षच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 2020 च्या उत्तरार्धात भारती आणि हर्ष यांना ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केली. भारती आणि हर्ष यांच्या घरावर आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले, ज्यात 86.50 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. एनसीबीने असा दावा केला होता की भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनी चौकशीदरम्यान गांजा खाल्ल्याचे कबूल केले होते. यानंतर भारती सिंगला एनडीपीएस कायदा 1986 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली. नंतर दोघेही जामिनावर बाहेर आले.

भारती आणि हर्षच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दोघेही टीव्ही तसेच यूट्यूबवर खूप सक्रिय आहेत. भारती आणि हर्ष यांचे YouTube वर LOL (Life of Limbachiyaa) नावाचे चॅनेल आहे, ज्यावर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसह शेअर करतात. दोन्ही व्लॉग्सना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

आजकाल हे जोडपे त्यांच्या कामाच्या आयुष्यासोबतच त्यांचा मुलगा लक्ष्यसोबत अधिकाधिक वेळ घालवताना दिसत आहेत. भारती आणि हर्ष दोघेही पालकत्वाचा आनंद घेत आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा भारती आणि हर्षच्या आयुष्यात अडचणी वाढताना दिसत आहेत.