सध्या धावपळीच्या युगात कामातून वेळ मिळत नसल्याने अनेकजण रात्रीचे जेवण उशिरा करतात. खरंतर चांगल्या आरोग्यासाठी फक्त योग्य आहारच नाही तर आहाराची वेळही योग्य असणे आवश्यक आहे.

जर तुम्हीही रोज रात्री उशिरा जेवत असाल तर ही सवय तुमच्या आरोग्य समस्या वाढवू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, रात्री 8 वाजल्यानंतर जेवण करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

तसेच जेवण उशिरा केल्याने किंवा जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि शरीरातील चयापचय क्रिया संथ गतीने सुरू होते. चला तर मग उशिरा जेवण केल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

वजन वाढू शकते

सतत उशिरा जेवण केल्याने झपाट्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर जेवण आणि झोपेमध्ये २ ते ३ तासांचे अंतर ठेवा. रात्री उशिरा जेवण करणे टाळा. एखाद्या दिवशी उशीर झाला तरी त्या रात्री हलके काहीतरी खा. रात्री फास्ट फूड खाणे टाळा.

पचन समस्या

अन्न उशिरा खाल्ल्याने पचनात त्रास होतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही. रात्री उशिरा जेवल्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या देखील उद्भवू शकते. उशिरा खाल्लेले अन्न सहजासहजी पचत नाही, त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात.

झोप

उशिरा जेवण केल्याने झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते. रात्री उशिरा जेवल्याने शरीराच्या नैसर्गिक चक्रावर परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्तीला झोपतानाही अस्वस्थता जाणवते आणि बराच वेळ झोप येत नाही. उशिरा जेवणे हे देखील झोप न येण्याचे एक कारण असू शकते.

ऊर्जा पातळी कमी होते

रात्री उशिरा जेवल्याने तुम्हाला उर्जा कमी जाणवू शकते. रात्री उशिरा जेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी उठता तेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि इतर समस्यांमुळे ऊर्जा पातळीत घट जाणवू शकते. बर्‍याच वेळा उशिरा जेवल्यामुळे आपल्याला नीट झोपही लागत नाही, त्यामुळे मेंदूला खूप त्रास जाणवू लागतो आणि एनर्जी लेव्हल कमी होते.

रक्तदाब आणि इतर रोगांचा धोका

उशिरा जेवण घेतल्यास उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह होऊ शकतो. खरे तर नियमित रात्रीचे जेवण उशिरा केल्याने तुमचे वजन वाढते आणि रक्तातील साखर अनियंत्रित राहते. यामुळे तुम्हाला बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो.