नवी दिल्ली : बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखालील इंग्लंड संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखालील न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. ही कसोटी मालिका लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे.

काल या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात किवी कर्णधार विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीदरम्यान इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार स्टोक्सने असे काही केले ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे.

नाणेफेकीदरम्यान स्टोक्स पारंपरिक पोशाखात मैदानात पोहोचला नाही. ब्लेझरऐवजी त्याने इंग्लंडचे माजी प्रशिक्षक आणि खेळाडू ग्रॅहम थॉर्पे यांच्या नावाची जर्सी घातली. थॉर्पे सध्या आजारी असून रुग्णालयात दाखल आहेत.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांच्या सन्मानार्थ, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स थॉर्पेचे नाव आणि क्रमांक लिहिलेली जर्सी परिधान करून नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल.”

सहसा कर्णधार संघाचा ब्लेझर घालतो आणि नाणेफेकीसाठी खाली येतो. मात्र, स्टोक्सने थॉर्पेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने परंपरा मोडीत काढत त्याच्या नावाची जर्सी घातली.

ग्रॅहम थॉर्पे यांना 10 मे रोजी गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दिग्गज फलंदाजाने इंग्लंडसाठी 100 कसोटींमध्ये 16 शतके झळकावली आणि 2005 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला. त्याने आपल्या कोचिंग कारकिर्दीला ऑस्ट्रेलियात सुरुवात केली आणि नंतर इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाले.

ट्रेव्हर बेलिस आणि ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या मार्गदर्शनाखाली ते इंग्लंडच्या राष्ट्रीय पुरुष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. जानेवारीमध्ये अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या पराभवानंतर थॉर्पे यांनी कोचिंग स्टाफमधील आपली भूमिका सोडली होती.