नवी दिल्ली : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने रविवारी (१३ नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. संथ सुरुवात असतानाही स्टोक्सने 49 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. यासोबतच त्याने काही खास रेकॉर्डही आपल्या नावावर केले.

एकदिवसीय, T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्धशतक

एकदिवशीय आणि T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा स्टोक्स हा इंग्लंडमधील पहिला आणि जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. स्टोक्सने 2019 एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या.

त्याच्या आधी भारताच्या गौतम गंभीर आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ही कामगिरी केली होती. गंभीरने 2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 50 हून अधिक धावा केल्या होत्या, तर संगकाराने 2007 एकदिवसीय विश्वचषक आणि 2014 T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 50 हून अधिक धावा केल्या होत्या.

स्टोक्सचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक होते. T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिले अर्धशतक झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी क्रेग किस्वेटरने 2010 टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्या आवृत्तीतही इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. 2010 नंतर इंग्लंडने दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 137 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने एक षटक शिल्लक राहून विजय मिळवला. 12 धावांत 3 विकेट घेतल्याबद्दल सॅम करनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.