नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात संघाच्या अपयशानंतर बीसीसीआयने काही मोठी पावले उचलली, त्यातील एक मोठे पाऊल म्हणजे बीसीसीआयने सध्याच्या निवड समितीला बरखास्त करून यासाठी तत्काळ अर्जही मागवले, ज्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर होती. मात्र आता समोर आलेल्या वृत्तामुळे निवडकर्त्यांची घोडदौड अधिकच रंजक झाली आहे असे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीचा भाग असलेले माजी भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. पण, त्यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. माजी खेळाडूंनी मोठ्या संख्येने या पदासाठी अर्ज केले असून चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांसारख्या नावांसह आतापर्यंत 60 हून अधिक अर्ज आले आहेत.

बीसीसीआयच्या पाच सदस्यीय निवड समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुक असलेले काही माजी क्रिकेटपटू वगळता, कोणत्याही मोठ्या नावांकडून अर्ज आलेले नाहीत. तथापि, काल अशी चर्चा होती की माजी फलंदाज हेमांग बदानी याने देखील या पदासाठी अर्ज केला होता, परंतु त्यांनी ट्विट करून लगेच या वृत्ताला नकार दिला.

या पदासाठी अर्ज केलेल्या मोठ्या नावांमध्ये माजी यष्टिरक्षक नयन मोंगिया, मनिंदर सिंग, शिव सुंदर दास आणि अजय रात्रा या नावांचा समावेश आहे. लवकरच या अर्जदारांची बीसीसीआयकडून मुलाखत घेतली जाईल. नवीन निवड समितीचे पहिले काम 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी संघ निवडणे असेल.

अर्जासाठी पात्रता

5 वर्षे किंवा त्यापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती, तसेच 7 किंवा अधिक कसोटी सामने किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 एकदिवसीय सामने किंवा 20 लिस्ट-ए सामने खेळलेले पाहिजे.