चंद्रपूर,दि. २०:  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतीक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

या आरोग्य विम्याच्या माध्यामातुन खासगी व सरकारी रूग्णालयांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेअंतर्गत कर्करोग, हृदय रोग शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, मूत्रविकार व त्यावरील शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा समावेश आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना -२०११ यादीनुसार लाभार्थी नागरिकांची निवड करण्यात आली आहे. या यादीनुसार चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण १६,५२७ लाभार्थी कुटूंबाचा समावेश असून ७२,३९४ नागरिक या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत एकूण १२,२०० नागरिकांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील मान्यताप्राप्त रूग्णालये, सामान्य रूग्णालये, मुसळे रूग्णालय, मानवटकर रूग्णालय, क्राईस्ट हॉस्पीटल, गाडेगोणे रूग्णालय, डॉ. अजय वासाडे रूग्णालय येथे आयुष्मान कार्ड निःशुल्क काढून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या माध्यमातुन आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५लाख रूपयांचे आरोग्य कवच उपलब्ध होणार असल्याने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.