ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अ‍ॅलिसा हॅलीच्या ऐतिहासिक खेळीमुळे संस्मरणीय ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने विश्वचषक फायनलमध्ये 170 धावांची धडाकेबाज खेळी करत पुरुष आणि महिला फलंदाजांचे सर्व विक्रम मोडीत काढले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 356 धावा केल्या. कोणत्याही महिला विश्वचषक फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या होती.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार हॅली होती, जिच्या बॅटने 138 चेंडूत 170 धावांची विक्रमी खेळी केली. यादरम्यान तिने एकूण 26 चौकार मारले आणि गोलंदाजांना 123 च्या स्ट्राईक रेटने मात दिली. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज असलेला पती मायकल स्टार्कही अंतिम सामन्यात हॅलीला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होता. पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी तो नेहमी मोठ्या सामन्यांमध्ये उपस्थित असतो.

2020 मध्ये, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, तेव्हाही स्टार्कने सामना पाहण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडला होता. पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ ०-२ ने पिछाडीवर होता. या निर्णयाचा आदर करत व्यवस्थापनाने त्याला ऑस्ट्रेलियाला परतण्याची परवानगीही दिली होती.

भारताविरुद्धच्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅलीने एकट्याने सामन्याचा मार्गच बदलून टाकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 4 विकेट गमावत 184 धावा केल्या होत्या. या सामन्यात हॅलीने अवघ्या 39 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. या खेळीने सामना भारताच्या पकडीपासून दूर नेला. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 99 धावांत गारद झाला आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी विश्वचषक जिंकला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *