नवी दिल्ली : माजी दिग्गज फलंदाज VVS लक्ष्मण यांची आगामी आशिया कप-2022 साठी भारतीय क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने बुधवारी ही घोषणा केली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

VVS लक्ष्मण हे सध्या NCA (बेंगळुरू) चे प्रमुख आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तो टीम इंडियासोबत हरारेलाही गेला होता. त्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने ३ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. आता तो राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या तयारीवर लक्ष ठेवणार आहे. उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा आणि आवेश खान यांच्यासह लक्ष्मण हरारेहून दुबईला रवाना झाला होता.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईला रवाना होण्यापूर्वी राहुल द्रविडची नियमित कोरोना चाचणी झाली होती, ज्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अशा परिस्थितीत तो सध्या संघासोबत यूएईला जाऊ शकला नाही. द्रविड बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत.

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर द्रविडही संघात सामील होईल. मात्र, त्यांना किती दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल, हे बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. आशिया कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती.