नवी दिल्ली : आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ सामन्यात पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. या सामन्यात असा गदारोळ झाला, त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर भिडले.

त्याचे असे झाले की, 19व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अफगाण गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली मोठा शॉट खेळताना झेलबाद झाला. यानंतर अफगाण गोलंदाज फरीद अहमदने आक्रमक पद्धतीने आसिफ अलीच्या दिशेने आनंद साजरा केला.

यानंतर फरीद अहमदच्या जल्लोषाच्या स्टाईलने संतापलेल्या पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीने आधी गोलंदाजाला धक्का दिला आणि नंतर त्याची बॅट दाखवली. आसिफ अलीने बॅट उचलली तेव्हा अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी मध्यभागी येऊन त्याला रोखले. फलंदाजाने केलेल्या या कृतीमुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

पाकिस्तानच्या या विजयाने अफगाणिस्तानसह भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 130 धावांचे लक्ष्य 19.2 षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नाणेफेक हारल्यानंतर अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 बाद 129 धावा केल्या आणि पाकिस्तान संघाला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.2 षटकांत 9 गडी गमावून 131 धावा केल्या आणि सामना जिंकला.

आशिया कप टी-20 स्पर्धेतील ‘सुपर फोर’ सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. पाकिस्तानच्या या विजयामुळे अफगाणिस्तानसह भारतीय संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.