नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सांगितले की, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो मानसिकदृष्ट्या तयार आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर जडेजा फलंदाजीला आला. त्याने हार्दिक पांड्यासोबत (नाबाद 33) पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करून भारताला लक्ष्यापर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जडेजा म्हणाला, ‘मला माहित होतं की असं होऊ शकतं. प्लेइंग इलेव्हन पाहिल्यानंतर मला माहित होते की अशी परिस्थिती येऊ शकते. मी मानसिकदृष्ट्या तयार होतो. सुदैवाने मी संघासाठी महत्त्वाच्या धावा केल्या. पहिल्या सातमध्ये मी एकमेव डावखुरा फलंदाज होतो. काहीवेळा जेव्हा डावखुरा फिरकीपटू आणि लेग-स्पिनर गोलंदाजी करत असतात, तेव्हा डावखुऱ्यांना धोका पत्करणे सोपे जाते.

तो म्हणाला, ‘जेव्हा मी क्रिझवर जातो तेव्हा परिस्थितीनुसार खेळतो. टी-20 मध्ये विचार करायला तुमच्याकडे जास्त वेळ नाही. तुम्हाला फक्त मैदानात उतरून व्यक्त व्हायचे आहे. मला फलंदाजी करताना धावा करायच्या आहेत आणि गरज पडेल तेव्हा विकेट्स मिळवायच्या आहेत. क्वालिफायरमधील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याबाबत विचारले असता जडेजा म्हणाला, “आम्ही हाँगकाँगविरुद्ध सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळणार आहोत आणि आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही.”

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलमधील जडेजाची कामगिरी विसरण्यासारखी होती आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड केली जाईल की नाही अशी चर्चा होती. अशा अफवांचा सामना कसा करता, असे विचारले असता जडेजा म्हणाला, “मध्यंतरी मी मेल्याची बातमी आली. यापेक्षा मोठी बातमी असू शकत नाही. मी जास्त विचार करत नाही. मला फक्त मैदानात उतरून कामगिरी करायची आहे. मी कठोर परिश्रम करतो आणि माझ्या कमकुवतपणात सुधारणा करतो, जे वास्तविक सामन्यांच्या परिस्थितीत मदत करते.”