नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवत भारतीय क्रिकेट संघाने सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने 2 बाद 192 धावा केल्या. विराटने 59 धावा केल्या तर सूर्यकुमारने 68 धावा केल्या. टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेणारी अप्रतिम भागीदारी या सामन्यात पाहायला मिळाली.

भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे विराटचे अर्धशतक ब-याच काळानंतर फलंदाजीतून उतरले. या सामन्यात कोहलीने 44 चेंडूंचा सामना करत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रोहित शर्मा आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर कोहलीने सूर्यकुमारसोबत 98 धावांची अखंड भागीदारी केली. या सामन्यात दोघांची जुगलबंदी अप्रतिम दिसली आणि सामन्यादरम्यान कोहली अनेकदा सूर्याच्या शॉट्सचे कौतुक करताना दिसला.

सामना संपल्यानंतर कोहलीने सूर्याला केला सलाम

भारताचा डाव आटोपल्यानंतर विराटने सूर्यकुमारला सलाम केला. माजी कर्णधार कोहली हा टीममॅन मानला जातो आणि असेच काहीसे येथे पाहायला मिळाले. सूर्यकुमारने मैदानात येताच भारतासाठी धावा काढण्यास सुरुवात केली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 6 षटकार आणि 6 चौकारांसह या फलंदाजाने केवळ 26 चेंडूत 68 धावा केल्या.

कोहली आणि सूर्याची झुंज

इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामादरम्यान मैदानावर कोहली आणि सूर्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली, सुर्या मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळतो आणि विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. सामन्यादरम्यान कोहलीने आपल्या ज्युनियर खेळाडूकडे एकटक पाहिलं आणि नंतर तो त्याच्याकडे गेला. मात्र, यावेळी सूर्याने काहीही केले नाही आणि शांतपणे उभा राहिला.