नवी दिल्ली : आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगचा कॅच ड्रॉप हा चर्चेचा विषय राहिला आहे. रविवारी रात्री टीम इंडियाच्या पराभवानंतर अर्शदीपला अनेक ट्रोलचा सामना करावा लागला. मात्र, यातील बहुतांश ट्विटर हँडल पाकिस्तानातूनच चालत असल्याचे सांगण्यात आले. आता अर्शदीपच्या वडिलांनी पुढे येऊन निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, ‘माझा मुलगा ट्रोल्सला घाबरत नाही.’

अर्शदीपच्या वडिलांनी सांगितले की, ‘आम्हाला ट्रोल्सला हरकत नाही. हे फक्त चांगले करण्याचा संकल्प मजबूत करेल. टीकाकार असल्याशिवाय माणूस सुधारू शकत नाही. आम्हाला कोणत्याही इन्वेस्टिगेशनची माहिती नाही. लोक भावनिक होऊन गोष्टी सांगतात. यामुळे अर्शदीप थांबणार नाही.’

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या डावात अठराव्या षटकात रवी बिश्नोईच्या चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीचा झेल सोडला. नंतर आसिफने काही फटके मारले. या सामन्यात एक चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. मात्र, अखेरच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करताना अर्शदीपने आसिफ अलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पाकिस्तानने सुपर फोरच्या लढतीत भारतीय संघाकडून ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना टीम इंडियाने 7 विकेट्सवर 181 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

भारतीय संघाला अजूनही अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे. टीम इंडियाचा सामना मंगळवारी श्रीलंका संघाशी होणार आहे. तो सामना जिंकून भारतीय संघ आशा जिवंत ठेवू शकतो.