मुंबई : भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अर्शदीप सिंगची उत्कृष्ट कामगिरी पाहता जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळावी, असे सेहवागने म्हटले आहे. या मालिकेसाठी संघातील पहिल्या पसंतीच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी, असेही सेहवाग म्हणाला.
अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. या मोसमातच नाही तर गेल्या आयपीएल मोसमातही त्याची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळेच पंजाब किंग्जने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता.
या मोसमातही अर्शदीपने अनेक प्रसंगी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अर्शदीपने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत फक्त तीन विकेट घेतल्या आहेत परंतु डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यामुळेच त्याचा भारतीय संघात समावेश करण्याची सूचना सर्वजण करत आहेत.
अर्शदीप सिंगबाबत बोलताना सेहवाग म्हणाला की, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि आवेश खान हे टी-२० विश्वचषकासाठी राखीव गोलंदाज असले पाहिजेत. “तुम्ही T20 वर्ल्ड कपबद्दल बोलत आहात पण मी म्हणेन की जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील मालिकेत त्याला संधी मिळाली पाहिजे. यावरून तो आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध कशी गोलंदाजी करतो याची कल्पना येईल आणि त्याला थोडा अनुभवही मिळेल. तुम्ही तुमच्या मुख्य गोलंदाजांना ब्रेक देऊ शकता कारण इंग्लंडमध्येही संघाला टी-20 मालिका खेळायची आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना घरच्या मालिकेत संधी दिली जाऊ शकते. उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांचा संघात समावेश करावा.”