नवी दिल्ली : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत अर्जुन चमकत आहे, केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही अर्जुन संघासाठी वेळोवेळी चमकदार क्रिकेट खेळत आहे. गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने हरियाणाविरुद्ध केवळ दमदार गोलंदाजीच केली नाही, तर दहाव्या क्रमांकावर येत फलंदाजीत चांगले योगदान दिले.

अर्जुन तेंडुलकरने 4 षटकात 22 धावा देत 1 विकेट घेतली. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5.50 होता. अर्जुन तेंडुलकरनेही मेडन ओव्हर टाकले. याशिवाय संघाला फलंदाजीत त्याची गरज असताना 10व्या क्रमांकावर खेळताना त्याने अवघ्या 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा केल्या.

अर्जुन तेंडुलकरची विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंतची कामगिरी प्रभावी ठरली आहे. या स्पर्धेत अर्जुनने सात सामन्यांत 4.98 च्या इकॉनॉमीसह 8 विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन तेंडुलकर हा प्रामुख्याने गोलंदाज आहे पण त्याची फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यासाठी लवकरच टीम इंडियासाठी दरवाजे उघडू शकते. सध्या टीम इंडियात हार्दिक पांड्या हा एकमेव असा खेळाडू आहे जो वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या लिस्ट-ए कारकिर्दीतील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 9 सामन्यांत 6.60 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत. IPL 2023 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा जुगार खेळताना अर्जुन तेंडुलकरला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते.