नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम जूनियरही दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याआधी, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याने पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला होता. शाहीन बाहेर पडल्यानंतर संघात मोहम्मद हसनैन याचा समावेश करण्यात आला होता. आता वसीम ज्युनियर संघातून बाहेर पडल्यानंतर हसन अलीला या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

यावेळी पाकिस्तानच्या संघाला भारत आणि हाँगकाँगसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतील पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर हाँगकाँगशी सामना होईल. दोन वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावणारा पाकिस्तानचा संघ यावेळी चांगलाच मजबूत दिसत आहे, मात्र संघाचे दोन प्रमुख गोलंदाज अशाप्रकारे बाहेर पडल्यानंतर संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

हसन अली हा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे आणि या 28 वर्षीय गोलंदाजाकडे अनुभवाची कमतरता नाही. हसन अलीने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ४९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 60 विकेट घेतल्या आहेत. हसन अलीची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 18 धावांत 4 विकेट्स. हसन अलीने भारताविरुद्ध एकमेव T20 सामना खेळला ज्यात त्याने 44 धावांत 2 विकेट घेतल्या.

आशिया कप 2022 साठी पाकिस्तान क्रिकेट संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शाहनवाज दहनी, मोहम्मद हसनैन, उस्मान कादिर