महाअपडेट टीम, 19 फेब्रुवारी 2022 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण, काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली होती. आज त्याच ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवरायांचा अभिवादन करून जयघोष केला.
कर्नाटकमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. आज शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि त्यांचे समर्थक बंगळुरूमध्ये पोहोचले. अमोल कोल्हे यांनी त्या ठिकाणी जाऊन दणक्यात शिवजयंती साजरी केली.
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देऊन शिवप्रेमींनी परिसर दणाणून सोडला होता. विशेष म्हणजे, अमोल कोल्हे यांनी शिवगर्जना दिली. शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अमोल कोल्हे यांच्यासह तमाम कार्यकर्त्यांनी शिवरायांना अभिवादन केलं.
काय आहे प्रकरण?
17 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील बंगळुरू शहरात याच ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. या घटनेमुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले होते. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी आणि शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोड करण्यात आली होती.
त्यामुळे कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली होती. या घटनेचे बेळगावमध्येही पडसाद उमटले होते. संतापलेल्या शिवप्रेमींनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येत आंदोलन केलं.
तसेच काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. रात्रीच्या सुमारास शिवप्रेमी चौकात एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी दगडफेकीची सुद्धा घटना घडली.
शिवप्रेमी आंदोलन करत असातना कन्नड समर्थकही रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी बेळगावात एकूण 27 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.
जिथे झाली होती विटंबना,
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 19, 2022
तिथेच घुमली शिवगर्जना!
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, तेथेच आज शिवजयंतीचे औचित्य साधून शिवनामाचा गजर केला. सोबत @NcpYouth_ चे अध्यक्ष @MahebubShaikh20, कार्यकर्ते व अनेक शिवप्रेमी होते. pic.twitter.com/fq5Yw5AS2F