मुंबई : अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने नुकतेच उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देत ‘गलवान ही बोल रहा है’ असे ट्विट केले होते. तिच्या या ट्विटनंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ऋचाला सर्व बाजूंनी लक्ष्य केले जात आहे. आता या प्रकरणावर अक्षय कुमारनेही प्रतिक्रिया दिली आहे. रिचा चढ्ढाच्या या वक्तव्यावर अक्षय कुमारला खूप वाईट वाटलं आहे.

वास्तविक, रिचा चढ्ढाने उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले होते. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हंटले होते की, “भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास तयार आहे. आम्ही शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्ही लवकरच ऑपरेशन पूर्ण करू.” या विधानाचा हवाला देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’

ऋचा चढ्ढाच्या वक्तव्यामुळे बॉलिवूड स्टार अक्षय कुमारलाही खूप वाईट वाटलं आहे. रिचा चड्ढाच्या व्हायरल ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विट करताना त्याने लिहिले, “हे पाहून वाईट वाटत आहे. आपल्या सैन्यदलाबद्दलचे उपकार कधीही विसरता कामा नये. आज आपण फक्त त्यांच्यामुळेच आहोत.” या पोस्टनंतर अक्षयने हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीही रिचा चड्ढाच्या वक्तव्याने खूप निराश झाले आहेत. अभिनेत्रीवर निशाणा साधत तिचे ट्विट बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडशी जोडून आपले मत व्यक्त केले आहे. त्याने रिचा चढ्ढाच्या व्हायरल ट्विटचा स्क्रिनशॉट ट्विट केला आणि लिहिले, “मला असे वागणे पाहून आश्चर्य वाटत नाही. ते खरोखरच भारतविरोधी आहेत. “दिल की बात जुबान पण कैसे ना कैसे आ जाती हैं” आणि मग लोकांना बॉलीवूडवर बहिष्कार का टाकायचा असा प्रश्न ते विचारतात.

ऋचा चढ्ढाने कधीही विचार केला नसेल की तिची एक टिप्पणी तिच्यासाठी इतकी मोठी समस्या बनू शकते. तिच्या ट्विटवर झालेल्या गदारोळानंतर अभिनेत्रीने माफीही मागितली होती. माफी मागताना अभिनेत्री म्हणाली होती, ‘माझा उद्देश लष्कराचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या तीन शब्दांवरून वाद वाढत आहे. माझ्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल तर त्याबद्दल मी माफी मागते.”