मुंबई : अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू आणि श्रिया सरन सारख्या सुप्रसिद्ध कलाकारांनी सजलेला ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत मोठी कमाई केली आहे. कमाईचा वेग पाहता हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दृश्यम 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच भारतात 64.14 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला 15.38 कोटींची चांगली ओपनिंग मिळाली आहे. समीक्षकांची प्रशंसा आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 21.59 कोटी रुपये कमावले. रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली आणि त्याने 27.17 कोटींचा व्यवसाय केला.

कोरोनाच्या काळापासून बॉलिवूड चित्रपटांची अवस्था वाईट आहे. अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट वाईट रीतीने फ्लॉप ठरले, पण ‘दृश्यम’ला ज्याप्रकारचा लोकांचा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. विशेष बाब म्हणजे ‘दृश्यम 2’ या वर्षाच्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची कमाई दुसऱ्या दिवशी 40.38 टक्क्यांनी वाढली, तर तिसऱ्या दिवशी 25.85 टक्क्यांनी वाढ झाली.

दृश्यम 2 चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. चित्रपटाला उत्कृष्ट रिव्ह्यू मिळाले आहेत. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. इशिता दत्ता, रजत कपूर, मृणाल जाधव आणि सौरभ शुक्ला हे कलाकारही या चित्रपटात दिसले आहेत. या सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटाचा पहिला भागही लोकांना आवडला. आता त्याचा सिक्वेल बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे