आरोग्यतज्ञ नेहमी सांगत असतात आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर व त्याचबरोबर त्वचेवर होत असतो. आपण अशा काही पदार्थांचे सेवन करतो ज्या आरोग्यदायी असतात परंतु आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

आपण नकळत चुकीच्या गोष्टींचे सेवन करत असतो, त्यामुळे आपल्याला त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचेच्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

जास्त तिखट खाणे

आपण तिखट हे केवळ समतोल प्रमाणातच खाल्ले पाहिजे. तिखट मसाला जसे की, गरम मसाला, चाट मसाला यासारखे मसालेदार मसाले आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच, पण त्याचबरोबर आपल्या त्वचेच्या आरोग्याला अधिक हानी पोहोचवतात. आयुर्वेदानुसार, जास्त मसालेदार किंवा खारट अन्न देखील त्वचेसाठी हानिकारक आहे.

आंबट खाणे

आयुर्वेदानुसार, त्वचेच्या समस्यांदरम्यान आंबट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात पित्त दोष वाढतो, ज्यामुळे ते रक्त दूषित होऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या आणखी वाढतील.

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन काळजीपूर्वक करा

त्वचेच्या समस्यांदरम्यान काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांचा त्रास होऊ शकतो याची जाणीव ठेवा. त्यामुळे तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. एका संशोधनानुसार, रक्तातील हार्मोन्सची उच्च पातळी आणि मुरुमांची समस्या यांचा थेट संबंध आहे. याचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो, त्यामुळे मुरुमांची समस्या सुरू होते.

ग्लूटेन टाळा

ग्लूटेन हा प्रोटीनचा एक प्रकार आहे. हे गहू, राई आणि बार्लीमध्ये आढळते. त्वचेच्या समस्यांमध्ये त्यांचे सेवन केल्याने आतड्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर खाज येण्याबरोबरच रॅशेसची समस्याही सुरू होते.