बिहारच्या सासाराम जिल्ह्यात सरकारी अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या काही लोकांनी ६० फूट लांबीचा पोलादी पूल सुटा करून चोरून नेल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ५०० टन वजनाचा हा पूल नासीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमियावर खेडय़ातील आरा कालव्यावर १९७२ साली बांधण्यात आला होता.
पाटबंधारे खात्याचे अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या काही लोकांच्या गटाने हा निकामी पूल गॅस कटर आणि अर्थमूव्हर्सच्या मदतीने तीन दिवसांत सुटा केला व चोरून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान एवढा मोठा प्रकार सुरु असतानाही नेमके परिसरात काय घडते आहे याची स्थानिक रहिवाशांना जाणीव होईपर्यंत व त्यांनी पोलिसांना कळवेपर्यंत हे चोरटे भंगारासह पसार झाले होते.
पाटबंधारे खात्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने ही संपूर्ण कामगिरी पार पाडण्यात आल्याचे दिसून आल्याची माहिती नासीरगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष कुमार यांनी दिली आहे.
एवढा मोठा वजनदार पूल चोरून नेल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या घटनेमागील लोकांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील भंगार व्यापाऱ्यांना या घटनेबाबत सूचना देण्यात आली आहे, असे कुमार म्हणाले.