सातारा दि. 14  : सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांना जागा अपुरी पडत आहे. सातारा शहरानजीक नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा कारागृह प्रशासनाने सादर करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्हा कारागृहाची पाहणी केली. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे आदी उपस्थित होते.

तटभिंतीची उंची वाढविणे, कारागृहातील सर्व बॅरेक, स्वयंपाकगृह व कार्यालयावरचे पत्रे बदलणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, अंतर्गत गटर लाईनचे काम, पाकगृहाचे नुतनीकरण यासह अन्य सुविधांसाठी निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देवून कारागृह अंत्यत नेटके व स्वच्छ ठेवल्याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.