नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून  मिळालेल्या ज्ञानाद्वारे राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवा पिढी राजकारणात येईल. ही युवा पिढी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  व्यक्त केला.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

श्री.दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ सभागृह व विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जातात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे कायदे केले जातात. या सभागृहांचे प्रतिनिधित्व करण्याची अनेकांची इच्छा असते. आपले द्विसभागृह अमेरिका, इंग्लड येथील सभागृहाप्रमाणे समन्वय साधण्याचे काम करीत असतात. दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. कनिष्ठ सभागृहात एखादा कायदा करताना त्यामध्ये काही सूचना, बदल वरिष्ठ सभागृह सुचविते. त्यानंतर पाठिंबा दिला जातो. त्याबाबत कुठलीही कटुता ठेवली जात नाही. हे राज्यातील द्विसभागृहाचे वैशिष्ट्य असल्याचे श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री.दानवे यांनी विधानपरिषदेतील आजी माजी ज्येष्ठ व श्रेष्ठ सदस्यांचा त्यांच्या कामकाजाबाबतचा उल्लेख केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.दानवे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.दानवे यांचा परिचय करुन दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.गायत्री डुकरे-पाटील यांनी आभार व्यक्त केले.