मुंबई : चरिथ असलंकाच्या (Charith Asalanka) शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकाने मंगळवारी (21 जून) खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. 30 वर्षांनंतर श्रीलंकेने त्यांच्याच भूमीवर द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. श्रीलंकेच्या 258 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 50 षटकांत सर्वबाद 254 धावांवर आटोपला.

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि एकूण 34 धावांत 3 गडी बाद झाले. यानंतर चरिथ असलंका आणि धनंजय डी सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली.

असलंकाने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि 106 चेंडूत दहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 110 धावा केल्या. याशिवाय डी सिल्वाने 61 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. याशिवाय खालच्या फळीतील वानिंदू हसरंगाने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे श्रीलंकेने 49 षटकांत 258 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, पॅट कमिन्स आणि मॅथ्यू कुहेनमनने प्रत्येकी दोन, तर ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला झटका कर्णधार अॅरॉन फिंचच्या रूपाने एकूण ४० धावांवर बसला. पण डेव्हिड वॉर्नरने शानदार फलंदाजी करत मिचेल मार्शसह दुसऱ्या विकेटसाठी 63 धावा जोडल्या, त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी मार्नस लॅबुशेनसोबत 35 धावा केल्या.

वॉर्नर एका टोकाकडून धावा करत राहिला, पण दुसऱ्या टोकाला काही अंतराने विकेट पडत राहिल्या. वॉर्नरने 112 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. याशिवाय पॅट कमिन्सने 35, ट्रॅव्हिस हेडने 27 आणि मिचेल मार्शने 26 धावा केल्या.

श्रीलंकेतर्फे चमिका करुणारत्ने, धनंजय डी सिल्वा, जेफ्री वेंडर्से यांनी प्रत्येकी दोन तर महिश थेक्षना, वनिंदू हसरंगा, दुनिथ वेलालगे आणि कर्णधार दासुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a comment

Your email address will not be published.