नवी दिल्ली, 14 : आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. यासह केंद्र शासनाकडून राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी दिली.

प्रगती मैदानामध्ये आयोजित आंतराराष्ट्रीय व्यापार मेळावा आजपासून सुरू झाला आहे. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री.सामंत म्हणाले, राज्यात येत्या काळात 30 ते 40 हजार कोंटींची गुंतवणूक होणार असून या माध्यमातून मोठ‌्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी राज्य शासन विविध धोरणही आखत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन श्री.सामंत यांच्या झाले. या उद्घाटन प्रसंगी उद्योग व खणन विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरूपमा डांगे, लघु उद्योग विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक श्री. कपाटे आदी उपस्थित होते.

राज्यात उद्योगांसाठी अनुकूल असे धोरण आखणार

महाराष्ट्र हे उद्योग अनुकूल राज्य असून आगामी काळात राज्यात अधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी विविध उद्योगांसाठी अनुकूल धोरण आखले जाणार आहे. हायड्रोजन धोरण आखणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. येत्या काळात याचा लाभ राज्याला होईल. माहिती तंत्रज्ञान धाेरणात फेरबदल करून ते नव्याने आखले जात आहे. इलेक्ट्रीकल वाहन, कृषी उद्योग, फुटवेयर, पोलाद, चामडे (लेदर) धोरण आखण्यात येणार असल्याचे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

पयर्टनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा तत्वत: निर्णय

पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा तत्वत: निर्णय घेतला असल्याची माहिती श्री.सामंत यांनी यावेळी दिली. यामुळे राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ पर्यटन क्षेत्रात करीअर करणाऱ्या तरूणांना देता येईल. उद्योगांसाठी वीज पुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतो. राज्यातील उद्योगांसाठी लागणारी अखंडीत तसेच सवलतीच्या दरावर वीज कशी मिळेल यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे ही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठी लँड बॅंक तयार केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील उद्योजकांचे दिल्लीत सादरीकरण

उद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे राज्यातील उद्योजकांचे सादरीकरण येत्या फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये दिल्लीत केले जाईल, असे श्री.सामंत यांनी सांगितले. याअंतर्गत राज्य शासनाने उद्योगांसाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती सविस्तररित्या पोहोचविली जाईल.

महाराष्ट्रातील बचत गटांच्या उत्पादनाला दिल्लीत मिळणार हक्काचे ठिकाण

महाराष्ट्रातील जे बचत गट दर्जेदार वस्तू उत्पादन करतात अशा बचत गटांना नेहमीसाठी राजधानी दिल्लीमध्ये हक्काचे विक्रीचे ठिकाण उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली. यासह आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आलेल्या महिला बचत गटांना तसेच कारागिरांसाठी योग्य निवास व्यवस्था महाराष्ट्र लघू विकास महामंडळातर्फे केली जाईल, असा निर्णय श्री.सामंत यांनी महिला बचत गंटाशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर घेतला.

दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रगती मैदान येथे 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” अशी आहे. महाराष्ट्राने या संकल्पनेवर विकासाचे दर्शन घडविणारे दालन साकारले आहे.

“वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” ही संकल्पना मांडताना डिज‍िटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत आहे. एकूण 45 स्टॉल्स याठ‍िकाणी मांडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवरील स्टॉल्स आहेत. बचत गटांचे, काराग‍िरांचे, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांतर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे आणि स्टॉर्टअप चे स्टॉल्स या ठीकाणी आहेत. यावर्षी महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ असण्याचा मान मिळालेला आहे.

‘महाराष्ट्र दिवस’ हा सांस्कृतिक कार्यक्रम 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता एमपी सहभागृहात होणार आहे.