नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत, इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने अनेक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावरून भारताला अनेक सुपरस्टार मिळाले आहेत. आयपीएल 2023 समोर ठेवून 23 डिसेंबर रोजी होणार्‍या मिनी-लिलावात पुन्हा एकदा अनकॅप्ड तरुण प्रतिभांवर लक्ष असेल. या लेखाद्वारे, आम्ही अशा तीन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर आयपीएलच्या मिनी-लिलावात करोडोंचा पाऊस पडू शकतो.

1. समर्थ व्यास

सौराष्ट्राचा हा खेळाडू अत्यंत विश्वासार्ह फलंदाज आहे जो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 177.4 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने सात सामन्यांत 317 धावा केल्या. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला चांगला फॉर्म सुरू ठेवला, जिथे त्याने मणिपूरविरुद्धच्या दुहेरी शतकासह सात सामन्यांमध्ये 371 धावा केल्या. त्याने सौराष्ट्र प्रीमियर लीगच्या ताज्या आवृत्तीत 143.93 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने चार सामन्यांत 154 धावा करून तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून समोर आला. अशा परिस्थितीत लखनौ सुपरजायंट्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादसारख्या आयपीएल संघांना मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजांची गरज आहे आणि ते व्यास याचा मिनी-लिलावात समावेश करू शकतात.

  1. शम्स मुलाणी

डावखुरा ऑफस्पिनर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुलानी याने रणजी ट्रॉफी आणि नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने सहा रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये 45 विकेट घेतल्या आणि अखेरीस सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून समोर आला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने 10 सामन्यात 16 विकेट घेतल्या होत्या. अशा स्थितीत त्याने मिनी लिलावात करोडोंची कमाई झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

3. विधवथ कवेरप्पा

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विधावथ कवेरप्पाने या देशांतर्गत हंगामात चांगली कामगिरी केली आहे. महाराजा ट्रॉफी T20 (पूर्वी कर्नाटक प्रीमियर लीग म्हणून ओळखल्या जाणार्‍या) च्या नवीनतम आवृत्तीत त्याने गुलबर्गा मिस्टिक्ससाठी 13 सामन्यांमध्ये 17 विकेट घेतल्या. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कवेरप्पाने कर्नाटकसाठी चांगली कामगिरी केली, त्याने आठ सामन्यांत 6.36 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 18 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत या खेळाडूने आयपीएल 2023 च्या मिनी लिलावातही जोरदार कमाई केली तर चाहत्यांना आश्चर्य वाटायला नको.